श्री दत्त महाराजांच्या वास्तव्याने, संत ज्ञांनेश्वरांच्या पदस्पर्शाने, संत कोंडाजी बाबांच्या संजीवन समधीने, महान तपस्वी व योगी श्री रंगदास स्वामींच्या तपश्चर्येने, विश्वगौरव पुरस्कार प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने पावन झालेली पवित्र भूमी-
श्री क्षेत्र अकलापूर
सृष्टीच्या पाठीवर आशिया खंडात हिंदुस्थान नावाचे एक राष्ट्र आहे आणि या भारत देशात महाराष्ट्र नावाचे एक महान राज्य आहे.
पवित्र तो देश. पावन ते कुळ । जेथे हरिचे दास । जन्म घेती ।
महाराष्ट्र ही शूरवीरांची व महान संतांची जन्मभूमी आहे. प्रभू श्रीरामांचा १४ वर्षे वनवासातील बराच काळ याच महाराष्ट्रातील, हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थात स्वराज्य निर्माण केले ते ही याच महाराष्ट्रात, १२ ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक ज्योतिर्लिंगे याच महाराष्ट्रात, जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताई यांचे जीवनकार्य हे ही याच महाराष्ट्रात. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी असे अनेक संत याच महाराष्ट्रात जन्माला आले, शिर्डीचे साईबाबा, संत गजानन महाराज, महिपती महाराज, चैतन्य महाराज तसेच अनेक महान संत या भूमित अवतारास आले.
सह्याद्रि पर्वत रांगांच्या कुशीत, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असणार्या कळसुबाई शिखराच्या व हरिश्चंद्र गडाच्या पूर्वेस, ब्रम्हगिरी पर्वताच्या दक्षिणेस, शिवनेरी गडाच्या पूर्वेस, दक्षिणवाहिनी मुळा व कस नदीच्या संगम तिरावरुन काहीशा अंतरावर वसलेले ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थान म्हणजे श्री क्षेत्र अकलापूर. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव व बोटा गावाच्या पूर्वेस ७ कि.मी. अंतरावर असलेले ८००० लोकसंख्या असलेले गाव श्री क्षेत्र अकलापूर.
गावाच्या उत्तर बाजूस मुळा आणि कास नदीचा संगम, उत्तरेस सह्याद्रि च्या पर्वतरांगा आणि याच परवतरांगांच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक व पुरातन गाव. गावाची भौगोलिक परिस्थिती चढउताराची, नद्या-नाले, ओढे आणि दऱ्याखोऱ्या असणारी. आर्थिक परिस्थिती जेमतेम. आजच्या गावाशेजारी एक जुना गावठाण असून . शिवकालीन सिद्धेश्वराचे कळशी मंदिर आहे. मंदिरासमोर भव्य दगडी नंदी, भव्य अशी दिपमाळा आणि हजारो वर्ष पुरातन बारव आहे. आजूबाजूस वड-पिंपळाचे मोठमोठे वृक्ष, उत्तरेस टेकडी आणि याच टेकडीवर नाही घडविला नाही बैसविला श्री दत्त गुरुराज.
१२०० वर्षांपूर्वी या गावात अनेक श्रद्धाळू व कष्टकरी लोक राहत होते. एक दिवस गावातील एका सद्गृहस्थाच्या स्वप्नात येऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला की गावाच्या उत्तरेला एक टेकडी आहे आणि या टेकडी मध्ये मी आहे.... मला बाहेर काढ... सकाळी उठल्यावर त्या सद्गृहस्थाने स्नान करून देवपूजा केली व गावातील हनुमान मंदिरात गावकरी एकत्र येतात त्या ठिकाणी आपल्या निवडक सहकाऱ्यांना घेऊन स्वप्नातील दृष्टांताची माहिती सांगितली. मग सर्व गावकरी एकत्र टेकडीवर गेले. टेकडीवर पाहणी करत असताना टेकडीच्या मध्यभागी एक चिर पडलेला भाग दिसला. त्यानंतर गावकऱ्यांनी पूर्ण चालीरितीप्रमाणे धार्मिक पूजा-विधी करून उत्खनन केले असता साक्षात स्वयंभू दत्त महाराज प्रगट झाले. ही मूर्ति एकमुखी, वालुकामय व चतुर्भुज असून श्री दत्त महाराजांचे बाल स्वरुपातील आहे. गावकर्यांनी षोडशोपचार पुजा, महाअभिषेक करून इतर गावकर्यांना सोबत घेऊन प्राणप्रतिष्ठा केली तो दिवस होता वैशाख शु. १२. आजही वैशाख शु.५ ते १२ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात व भव्य स्वरुपात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील थोर किर्तनकार व प्रवचनकार यांची किर्तने व प्रवचने होतात. पुढे काही वर्षानी श्री संत कोंडाजी बाबा यांनी आपले जीवनकार्य इथे याच पावन भूमीत व्यथित केले. ते श्री दत्त महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांची अपार श्रद्धा व भक्ती पाहून दत्त महाराजांनी त्यांना साक्षात दर्शन दिल्याचे सांगण्यात येते. श्री दत्त महाराजांच्या समोरच श्री संत कोंडाजी बाबांची संजीवन समाधी आहे.
१३ व्या शतकात योगियांची माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, गुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताबाई आपल्या रेडयासह पैठणहून आळंदी ला शुद्धपत्रिका घेऊन जात असताना नेवासा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ लिहिला व तेथून ते मजल दरमजल करत ई स १२९१ मध्ये श्री क्षेत्र अकलापुर येथे आले. त्यावेळी सिध्देश्वराच्या मंदिरासमोर भव्य असे पिंपळाचे झाड होते, त्याच झाडाखाली ही चारही भावंडे आपल्या रेडयासह विसावली व नंतर स्वयंभू श्री दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेले. याच ठिकाणी या भावंडांनी दीड दिवस मुक्काम केल्याचे वर्णन अनेक संतांनी व साहित्यिकांनी आपल्या ग्रंथात केले आहे.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य । मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला । - गोरक्ष वोळला गहिनीप्रती । गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेव सार चोजविले । स्वयंभू दत्त महाराजांचे दर्शन घेऊन व श्री सिद्धेश्वरास प्रार्थना करून ही सर्व भावंडे पुढे आजच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे(संतवाडी) या ठिकाणी गेले. तेथे त्यांचा रेडा थकलेला होता म्हणून ज्ञानदेवांनी तेथेच आपल्या रेडयास समीधी दिली. अकलापूर येथे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली मुक्कामास बसले होते, त्या श्री सिध्देश्वराच्या मंदिराच्या उत्तरेला ग्रामस्थांनी कळसी मंदिर बांधले आहे. तसेच प्रत्येक वद्य १२ ला याठिकाणी अन्नदान व कीर्तन होत असते. या मंदिरात पूजा, हरिपाठ, कार्तिकस्नान इ. कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदर व निसर्गमय आपणास पहावयास मिळतो. अनेक भाविक याठिकाणी श्रद्धापूर्वक दर्शनास येतात, पुढे काही वर्षानी या ठिकाणी एक महान तपस्वी श्री सिध्देश्वराच्या मंदिरासमोर प्रगट झाले. ते कोठून आले, त्यांचे पूर्वीचे अवतार कार्य काय, माता पिता कोण याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा आजही उपलब्ध नाही. त्यांच्या समवेत गाईंचा मोठा कळप होता. व एक घोडी होती. दत्त मंदिरासमोर ते रोज आपल्या गाई चारत असत व सिध्देश्वराच्या मंदिरात हे योगी पुरुष तपश्चर्या करत असत. तब्बल १२ वर्ष श्री रंगदास स्वामींनी या पवित्र भूमीत तपश्चर्या केली. पुढे जनावरांना चारा टंचाई भासल्याने त्यांनी स्थलांतर करण्याचे ठरवले व स्वयंभू दत्त महाराजांचे आणि श्री सिध्देश्वराचे दर्शन घेऊन आपल्या गाईसमवेत गावाच्या पूर्वेकडे निघाले मात्र त्याबाबत ग्रामस्थांना कोणतीही कल्पना किंवा पुर्वसुचना मिळू शकली नाही. हे महान योगी पुढे मुंजेवाडी, आभाळवाडी मार्गे सध्याच्या पारनेर तालुक्यातील पोखरी या गावी गेले व तेथे काही दिवस थांबून कन्हेर या गावी आपली तपश्चर्या चालू केली. तेथेही श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे. या गावातील लोकांनी श्री रंगदास स्वामींचे भव्य मंदिर बांधून मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पुढे ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणार्या आणे या गावी गेले आणि काही काळानंतर समाधीस्थ झाले. आजही अकलापूर येथे स्वयंभू श्रीदत्त महाराजांच्या मंदिरात गावकऱ्यांनी या महान योगी तपस्वीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे.
२००१-०२ मध्ये गावकर्यांनी श्री दत्त महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले. मंदिरं बांधून झाल्यानंतर मंदिराच्या समोर भव्य सभामंडप बांधण्याचे ठरले व त्यानुसार उत्खनन करत असताना एका समाधीस स्पर्श झाला आणि त्या ठिकाणी वातावरण अचानक बदलून गेले. ही बातमी वार्यासारखी संपूर्ण गावात व परिसरात पसरली. गावकरी घाबरले परंतु पुढे काही अनर्थ होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी चर्चा केली व ती जागा पूर्ववत केली. समाधीची विधिवत पुजा करून त्यावर आवरण उभे केले. हीच महान संत व दत्त भक्त श्री कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी होय. ज्यावेळी उत्खनन करत असताना समाधीला स्पर्श झाला तेव्हा श्री संत महिपती महाराज यांचे परम भक्त श्री माणिकबाबा (ताहाराबाद, ता- राहुरी) यांच्या स्वप्नात जाऊन संत कोंडाजी बाबा यांनी दृष्टांत दिला. ताहाराबाद येथून ते तात्काळ श्री क्षेत्र अकलापूर येथे आले व ग्रामस्थांना विचारू लागले. ग्रामस्थांनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला व पुन्हा एकदा त्या समधीची पुजा विधी व होमहवन केले. गावाची आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. अकलापूर मध्ये दत्त भक्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सोहळा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान गावातील तरुणांनी एकत्र येऊन मुंबईत कामाला असणार्या लोकांचे मुंबईकर मंडळ स्थापन केले. गावच्या लोकांचे काही पैसे व मुंबईकरांचे पैसे एकत्र करून मंदिर बांधायचे ठरवले. पारनेर कळस या गावाचे महादेव क्षीरसागर या कारागिरास मंदिर बांधावयास दिले. सदरचे मंदिर दगडात बांधले गेले आहे. अनेक दत्त भक्तांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे. मंदिराला भव्य सभा मंडप आहे. दर गुरुवारी व पौर्णिमेस महाआरती असते व या आरतीला हजारो भाविक उपस्थित असतात. (आरतीची वेळ – सकाळी 0८:३०, दुपारी १२:३० व सायंकाळी ०७:३०). या कार्यक्रमास राज्य भरातून लाखो दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या पवित्र ठिकाणी शिस्त, शांतता आणि कमालीची स्वच्छता आपणास पहावयास मिळते. अनेक दत्त भक्तांनी महाप्रसादासाठी देवस्थान समिती कडे नोंदणी केलेली आहे. लाखो भाविकांच्या येण्याने व देणगी स्वरूपाने या या पवित्र स्थानाचा झपाट्याने कायापालट होत आहे. या ठिकाणी येणार्या दत्त भक्तांसाठी राहण्याची उत्तम सोय देवस्थान समिती कडून योग्य दरात करण्यात आली आहे. भव्य भक्तनिवास बांधण्यात आले आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
मुंबईपासून २२५ किमी, पुण्याहून ११५ किमी, नाशिक पासून ११० किमी, शिर्डी पासून ८५ किमी, जुन्नर(शिवनेरी) पासून ५० किमी, आळेफाटा पासून सुमारे २० किमी, संगमनेर पासून ५० किमी, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणार्या बोटा या गावापासून ८ कि.मी. व घारगाव पासून ७ कि.मी. अंतर आहे. दत्त भक्तांना श्री क्षेत्र अकलापूरकडे येण्यास वाहतुकीची अडचण नाही. दर गुरूवारी आरतीच्या कार्यक्रमासाठी हजारो भाविक पुणे, अहिल्यानगर, नाशिक व आजूबाजूच्या जिल्ह्यातून उपस्थित असतात. या मंदिराचा कळस सोन्याचा असावा म्हणून हजारो माता-भगिनींनी आपल्या गळ्यातील सोने देणगी सरूपत दान केले व तब्बल ५१ तोळे सोनं जमा झाले. मुंबई येथील कारागिर यांनी अल्पदरात सुवर्णकलश तयार करून दिला आणि २९.११.२००३ रोजी चंपाषष्ठी च्या मुहुर्तावर विश्वगौरव पुरस्कार प्राप्त प. पू. श्री स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शुभहसते लाखो दत्त भक्तांच्या उपस्थितीत हा न भूतो ना भविष्यते असा नयनरम्य कलशारोहन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास अनेक मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प. पु. गगनगिरी महाराज यांनी या ठिकाणी सर्व भक्तांना भक्तीचा मार्ग सांगितला व जीवनाचा उद्धार करण्याचा मूलमंत्र दिला. प. पू. गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शनि पावन झालेली ही भूमी लाखो दत्त भक्तांचे श्रध्दास्थान आहे. अनेक दत्तभक्त देणगी व अन्नदान मोठ्या भक्तीभावाने करतात. ज्या टेकडीमध्ये श्री दत्त स्वयंभू प्रगट झाले त्या टेकडीस अनुसया टेकडी असे म्हटले जाते. अनुसया टेकडीच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या प्रगति पथावर आहे.
या मंदिराचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांनी देवस्थान ट्रस्ट स्थापन केला असून सर्व विश्वस्त मंडळ मोठ्या भक्तिभावाने, तनमनधनाने व पारदर्शी पद्धतीने कारभार पाहतात. या देवस्थानचा विकास झपाट्याने होत आहे. वेगाने होणारा कायापालट पाहून अनेक दत्त भक्त आश्चर्य व्यक्त करतात. नवसाला पावणारे दत्त म्हणून या देवस्थान ची महती आहे. लाखो भाविकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. विशेष म्हणजे अंधश्रद्धेला इथे अजिबात थारा नाही. शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ति नेहमीच फलदायी असते. अनेक भक्तांच्या जीवनात कायापालट झाल्याचे अनुभव भक्त स्वत: सांगतात.
भाविकांना कोणतेही शुभकाम करावयाचे असल्यास गुरुवार हा दिवस पवित्र मानला जातो. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होत नाही. मंदिर आणि मंदिर परिसरात मांस भक्षण करून येण्यास सक्त मनाई आहे. असे कुणी केल्यास त्याला वाईट अनुभव येतात. असभ्य वर्तन, उत्तेजक व अश्लील कपडे परिधान करून मंदिरात व परिसरात येण्यास सक्त मनाई आहे. मध्यपान व धूम्रपान करण्यास मंदिर परिसरात सक्त मनाई आहे.
श्री दत्त जयंतीला सायंकाळी ठीक ६ वाजता दत्त जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. ४ ते ५ लाख भाविक या जन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असतात. गुरुपौर्णिमा व वैशाख शु. १२ या दिवशी श्री दत्त महाराजांची भव्य पालखी निघते. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक सहभागी होतात साक्षात स्वयंभू दत्त महाराज या दिंडीत सहभागी असतात अशी भावना आहे.